Site icon mcnnews.tv

रोहित पवारांचा गंभीर आरोप, “महाराष्ट्रात निवडणुकीच्या दरम्यान सत्ताधाऱ्यांनी दोन हजार कोटींचं वाटप केलं”

 

रोहित पवारांचा गंभीर आरोप

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा २० तारखेला म्हणजेच येत्या सोमवारी पार पडणार आहे. तर देशातला शेवटचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलेलं पाहण्यास मिळालं. बारामतीची निवडणूक चर्चेत राहिली तसंच ज्यादिवशी मतदान पार पडलं त्यादिवशी पैसे वाटपाचा आरोप महाविकास आघाडीने केला. त्या पाठोपाठ निलेश लंके यांनीही नगरच्या निवडणुकीत पैसे वाटप झाल्याचा आरोप केला. आता रोहित पवार यांनी राज्यात सत्ताधाऱ्यांनी दोन हजार कोटींचं वाटप झालं आहे असं म्हटलं आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपासह सत्ताधारी पक्षांकडून पैशांचं अमाप वाटप होतं आहे. नेते, गुंड आणि मतं विकत घेण्यासाठी आत्तापर्यंत राज्य सरकारन दोन हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. तर मागच्या अडीच वर्षांत या सरकारने २५ हजार कोटींचे घोटाळे केले आहेत असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. आमची सत्ता आल्यानंतर आम्ही या सगळ्या प्रकरणांची चौकशी करु असंही रोहित पवार म्हणाले आहेत. रोहित पवारांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.

पैसे वाटपासाठी टँकरपासून हेलिकॉप्टरचा वापर

सत्ताधाऱ्यांनी पैसे वाटपसाठी टँकर, रुग्णवाहिका, झेड सिक्युरिटीतल्या गाड्या, हेलिकॉप्टर या सगळ्यांचा वापर केला असाही आरोप रोहित पवारांनी केला आहे. आता निवडणुकीत शेतकरी आणि मराठी माणूस सत्ताधाऱ्यांना धडा शिकवणार आहे असंही वक्तव्य रोहित पवार यांनी केलं. तसंच महायुतीला जास्त जागा मिळणार नाहीत असंही त्यांनी म्हटलं आहे. एकट्या बारामतीत १५० कोटी रुपये मतदानाच्या पू्वी खर्च करण्यात आले असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

महायुती १६ ते १८ जागा जिंकेल

रोहित पवार याच पत्रकार परिषदेत म्हणाले की लोकसभा निवडणुकीत भाजपाला १३ ते १४ जागा, एकनाथ शिंदेंच्या गटाला ३ जागा मिळतील तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही. महायुतीला १६ ते १८ जागा मिळतील बाकी जागा आम्ही जिंकू असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही लोकसत्ताच्या कार्यक्रमात हेच मत व्यक्त केलं आहे की अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही. त्यापाठोपाठ आता रोहित पवार यांनीही हेच वक्तव्य केलं आहे. आता यावर सत्ताधारी उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Exit mobile version