Site icon mcnnews.tv

1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीस मनाई, नौकांना समुद्रात जाण्यास बंदी…

महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. अशी माहिती मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त अभयसिंह शिंदे इनामदार यांनी दिली आहे.

रत्नागिरी (जिमाका) : राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याचं चित्र गेल्या आठवड्यात पाहायला मिळालं. राजधानी मुंबईतही (Mumbai) सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी, घाटकोपमध्ये महाकाय बॅनर कोसळून दुर्घटनाही घडली. तर, अद्यापही पुढील 2 दिवसांसाठी अनेक जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. आता, मान्सूनपूर्व (Monsoon) पाऊसानंतर यंदा लवकरच मान्सूनची हजेरी लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे, पावसाळ्याच्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे. मच्छिमारांसाठी व नौका पर्यटकांसाठी काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, 1 ते 31 जुलै या कालावधीत 2 महिन्यांसाठी मासेमारी (Fishing) करण्यास मनाई करण्यात आली आहे.

मच्छिमारी सहकारी संस्था, त्यांचे नौकामालक, सभासद व अन्य संबंधितांना महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारणा अध्यादेश, 2021 अन्वये यावर्षी 01 जून  ते 31 जुलै 2024 (दोन्ही दिवस धरुन 61 दिवस) या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. अशी माहिती मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त अभयसिंह शिंदे इनामदार यांनी दिली आहे.

या बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करुन मासेमारी करणारे मच्छिमार खालील कारवाईस पात्र होतील.

1) पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील.
2) पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर- यंत्रचालित नौकांना लागू राहणार नाही.
3) समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका दि. 01 जून 2024 पूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे. तसेच दि. 31 जुलै 2024 वा त्यापुर्वी सदर नौकांना समुद्रात मासेमारीकरीता जाता येणार नाही.
4) राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापुढे) खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांस केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण / मार्गदर्शक सुचना/ आदेश लागु राहतील.
5) राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासुन 12 सागरी मैलापर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना आढळल्यास / केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), 2021 च्या कलम 14 अन्वये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल तसेच कलम 17 मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल.
6) पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही.
7) बंदी कालावधीमध्ये राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकास अवागमन निषिध्द आहे.

Exit mobile version