राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला किती जागा मिळायला हव्या, यासंदर्भात भाष्य केलं आहे.
दिल्ली(Delhi): लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं. त्यानंतर आता केंद्रात एनडीएचं सरकारही स्थापन झालं. नरेंद्र मोदी यांनी काल तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यामध्ये एनडीएच्या काही नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, यामध्ये महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एकही मंत्रिपद मिळालं नाही. त्यावरून राज्याच्या राजकारणात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाला किती जागा मिळायला हव्या, यासंदर्भात भाष्य केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने विधानसभेला ८० जागा लढवल्या पाहिजेत”, असं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.
अनिल पाटील काय म्हणाले?
“महायुतीमध्ये आम्ही कर्तव्य म्हणून आमच्या पक्षाच्यावतीने आम्ही सर्व जबाबदारी पार पाडली आहे. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठिमागे उभे राहून खंबीरपणे काम केलं आहे. सर्व विधानसभा मतदारसंघातील तालुकाध्यक्षांनी चांगलं कामं केलं. त्यामुळे भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा महायुतीच्या विजयात मोठा वाटा आहे”, असं अनिल पाटील यांनी सांगितलं.
“लोकसभा निवडणुकीत आम्हाला फक्त ४ जागा मिळाल्या. एक जागा महादेव जानकर यांना देण्यात आली. या निवडणुकीत आमची फक्त एक जागा निवडून आली. मात्र, एनडीएची आघाडी निर्माण करण्यात आली त्या आघाडीच्या नियमानुसार, एका पक्षाला वेगळा न्याय कसा देणार, असं त्यांना वाटलं असेल. पण भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी आमच्या सर्व नेत्यांना विश्वासात घेतलं आहे. येणाऱ्या काळात काही वेगळं मिळत असेल तेव्हा नक्की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा विचार होईल”, असं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे.
विधानसभेला किती जागांची मागणी?
विधानसभा निवडणुकीत पक्षाला किती जागा मिळतील, या प्रश्नावर बोलताना अनिल पाटील म्हणाले, “महायुतीमध्ये एक निकष ठरलेला आहे. मात्र, छगन भुजबळ यांनी मुंबईतील पक्षाच्या मेळाव्यात बोलताना ९० जागांची मागणी केलेली आहे. पण ८० जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने लढवल्या पाहिजेत. त्यामध्ये शक्य असेल तर सर्व्हे करून उमेदवारांची घोषणा केली पाहिजे. त्यासाठी आतापासूनच कामाला लागलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ८० जागांची मागणी करेल आणि तेवढ्या आम्हाला मिळतील”, असं अनिल पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या ४ जागांची मागणी आम्ही करणार आहोत. त्याबरोबरच धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यात ८ जागांची मागणी करणार आहोत, असंही अनिल पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
मुंबई (Maharashtra Assembly Elections 2024): मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
राज ठाकरे(Raj Thackeray):’पुतळे ही केवळ राजकीय सोय’, महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरुन राज ठाकरे संतापले!