पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभेची जागा महायुतीसाठी डोकेदुखी बनलीय.
पुणे(Pune): लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटामध्ये प्रत्येकी 3 पक्ष आहेत. त्यामुळे अनेक मतदारसंघात जागावाटपाचा पेच निर्माण होणार आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूरची जागा महायुतीसाठी डोकेदुखी बनलीय.
इंदापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपा नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे दोन नेते निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहेत. मागील दोन विधानसभा निवडणुकीत भरणे विरुद्ध पाटील अशी थेट लढत झाली. दत्तात्रय भरणे या दोन्ही निवडणुकीत विजयी झाले. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी हर्षवर्धन पाटील तयारीला लागले आहेत.
5 वर्षांनी तोच पेच
2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी इंदापूरची जागा प्रतिष्ठेची केली होती. वाट्टेल ते झाले तरी चालेल पण इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही…भले आघाडी नाही झाली तरी बेहत्तर!, असं पवार यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर हर्षवर्धन पाटील काँग्रेसमधून बाहेर पडले आणि भाजपामध्ये दाखल झाले. पण, गेल्या पाच वर्षात राज्यातील राजकारणात मोठा बदल झालाय. अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह महायुतीमध्ये दाखल झाले आहेत. या आमदारांमध्ये दत्तात्रय भरणे यांचाही समावेश आहे. त्यामुळे 5 वर्षांनी पुन्हा एकदा इंदापूरसाठी पाटील आणि भरणे आमने-सामने आले आहेत.
लोकसभा निवडणुकीत मनोमिलन

यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचं मनोमिलन झालं. देवेंद्र फडणवीसांसोबत जी चर्चा झाली त्या शब्दाची पूर्तता केली जाईल, असं सांगत अजित पवार यांनी नरमाईची भूमिका घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरात संवाद मेळावा घेत तुमच्या मनात जे आहे ते कृतीत उरवेल असा जाहीर शब्द इंदापूरच्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यामुळे भाजपा ही जागा लढवणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
दत्तात्रय भरणे आणि हर्षनवर्धन पाटील हे दोन्ही नेते याबाबत फडणवीस आणि पवार यांचा निर्णय अंतिम असल्याचं सागंत आहेत. त्यांच्या सावध भूमिकेमुळे इंदापूरची जागा कोण लढवणार? हा सस्पेन्स आणखी वाढलाय.
तिरंगी लढत होणार?
संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रीया सुळे विजयी झाल्या. त्यांना इंदापूर मतदारसंघातही मताधिक्य मिळालं होतं. या विजयानंतर शरद पवार यांनी इंदापूरच्या शेतकऱ्यांशी बोलताना ‘मला चार-सहा महिन्यात सरकार बदलायचं आहे,’ असं मोठं वक्तव्य केलं होते. महायुतीमधील तिढ्याकडं शरद पवारांचं लक्ष असणार यात शंका नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत इंदापूरमध्ये तिरंगी लढत देखील होऊ शकते
More Stories
रुपाली चाकणकर(Rupali Chakankar on Supriya Sule):सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी, रुपाली चाकणकरांचा हल्लाबोल, म्हणाल्या बदला घ्यायचा असेल तर तुतारीला मतदान करु नका
मुंबई (Maharashtra Assembly Elections 2024): मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार
बारामती(Baramati):लोकसभेला सुनेत्रा पवार, आता विधानसभेला जय पवार बारामतीतून रिंगणात उतरणार?