DC vs GT : दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल संतापला, ‘या’ खेळाडूला धरले जबाबदार

Shubman Gill Reaction : आयपीएलच्या १७व्या हंगामातील ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा ४ धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करता

दिल्लीने ४ बाद २२४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सला ८ बाद २२० धावाच करता आल्या.

मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेअरची मोठी भूमिका –शुबमन गिल म्हणाला, “जेव्हा तुम्ही २२४ धावांचा पाठलाग करत असाल, तेव्हा योजनांबद्दल बोलण्यात काही अर्थ नसतो. कारण त्यावेळी तुम्हाला फक्त फक्त धावा करायच्या असतात. मला वाटते की मोठ्या धावसंख्येच्या सामन्यांमध्ये इम्पॅक्ट प्लेअर मोठी भूमिका बजावतात. तुम्ही विकेट गमावल्या तरीही फलंदाजांना पुढे जाण्यासाठी अतिरिक्त पाठिंबा मिळतो. त्यामुळे फलंदाजांना आक्रमकपणे धावा काढण्याची मोकळीक मिळते.”

पराभवासाठी अप्रत्यक्षपणे मोहितला धरले जबाबदार –

गुजरात टायटन्सचा कर्णधार पुढे म्हणाला, “एकेकाळी आम्हाला वाटले होते की आम्ही दिल्ली कॅपिटल्सला २००-२१० धावांपर्यंत रोखू शकतो, पण आम्ही शेवटच्या २-३ षटकांमध्ये काही अतिरिक्त धावा दिल्या.” या वक्तव्याने शुबमन गिलने अप्रत्यक्षपणे मोहित शर्माला जबाबदार धरले आहे. कारण या सामन्यातील शेवटचे षटक मोहित शर्माने टाकले होते आणि ३१ धावा दिल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात मोहित शर्माने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये एकही विकेट न घेता ७३ धावा दिल्या. यासह मोहित शर्माने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा स्पेल टाकणारा गोलंदाज ठरला.

दिल्लीचे मैदान लहान होते –

शुबमन गिल पुढे म्हणाला, “हे एक छोटे मैदान होते, जेव्हा आम्ही लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बाहेर पडलो, तेव्हा आम्ही याबद्दल चर्चा केली होती. पंरतु मैदानावर तुमची योजना योग्य रीतीने अंमलात आणणे खूप महत्त्वाचे ठरते. जर तुमच्याकडे क्रिझवर सेट फलंदाज किंवा फिनिशर असेल तर तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. जर खेळपट्टीत काही असेल तर ते ठीक आहे, परंतु अशा खेळपट्ट्यांवर आपण आपल्या सर्व योजना अचूकपणे अंमलात आणल्या आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे. मग ते यॉर्कर्स असो किंवा इतर कोणतीही गोलंदाजी असो.”

You may have missed