‘धनंजय मुंडे यांनी फिल्डिंग लावून बजरंग सोनवणेंना पंकजांच्या विरोधात उभं केलं’ – वंचित बहुजन आघाडी

Beed Lok Sabha Election : धनंजय मुंडे यांनी फिल्डिंग लावून बजरंग सोनवणे यांना डमी उमेदवार म्हणून उभ केल्याचा आरोप वंचितकडून करण्यात आला आहे.

बीड : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी फिल्डिंग लावून बजरंग सोनवणे  यांना पंकजा मुंडेयांच्याविरोधात डमी उमेदवार म्हणून उभं केल्याचा आरोप वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर (Rekha Thakur) यांनी केला. जरी बजरंग सोनवणे निवडून आले तरी ते दिल्लीत जाऊन भाजपच्या बाजूने बसतील असंही त्या म्हणाल्या. बीडमध्ये वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार अशोक हिंगे यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत जाहीर सभा घेतली. या सभेला संबोधित करताना वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी हे वक्तव्य केलं.

बजरंग सोनवणे निवडून आले तर भाजपमध्ये जातील

बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होत असून यामध्ये वंचित बहुजन आघाडी, महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना निवडून आणण्यासाठी फिल्डिंग लावली असून बजरंग सोनवणे यांना डमी उमेदवार म्हणून उभं केलं असल्याचा आरोप वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी केला. पंकजा मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनवणे जरी निवडून आले तरी दिल्लीत ते भाजपच्याच बाजूला जाऊन बसतील असेदेखील रेखा ठाकूर म्हणाल्या. त्यावेळी सभेत बोलताना रेखा ठाकूर यांनी पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यावर टीका केली. बजरंग सोनवणे हे धनंजय मुंडे यांनी उभे केलेले डमी उमेदवार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बजरंग सोनवणे कर्माने मराठा नाहीत

याच सभेमध्ये बोलताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यावर जोरदार टीका केली. निवडणूक आली की बजरंग सोनवणे यांना मराठा समाज आठवतो, ते जरी जातीने मराठा असले तरी कर्माने मराठा नाहीत असं म्हणत अशोक हिंगे यांनी बजरंग सोनवणे यांचा मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून चांगला समाचार घेतला. यापूर्वी जे मराठा आंदोलन झाले त्यामध्ये बजरंग सोनवणे कुठेच नव्हते. मनोज जरांगे यांची बीडमध्ये आणि आंतरवाली सराटी येथे जी सभा झाली तिथे देखील ते कुठे दिसले नाही. जेव्हा अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला तेव्हा पहिल्यांदा प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.त्या घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यामुळे बजरंग सोनवणे हे फक्त निवडणुकीपुरताच मराठा समाजाचा वापर करतात अशी टीका अशोक हिंगे यांनी केली.

You may have missed