पंजाब किंग्जने आयपीएल स्पर्धे केकेआरविरुद्ध २६२चं लक्ष्य केलं पार

पंजाब किंग्जने आयपीएल स्पर्धेत २६२ धावांचं लक्ष्य ८ चेंडू आणि ८ विकेट्स राखून पार केलं.

 

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात धावांचा पाठलाग करतानाचा नवा विक्रम रचत पंजाब किंग्ज संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध ऐतिहासिक विजय साकारला. इडन गार्डन्सच्या मैदानावर चौकार-षटकारांची लयलूट झालेल्या लढतीत कोलकाताने २६१ धावांचा डोंगर उभारला. पंजाबच्या फलंदाजांनी वादळी खेळी रचत अशक्यप्राय वाटणारा विजय साकारला. पंजाबने ८ चेंडू आणि ८ विकेट्स राखून संस्मरणीय विजय मिळवला. कोणत्याही ट्वेन्टी२० स्पर्धेत धावांचा पाठलाग करतानाची ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. या सामन्यात विक्रमी ४२ षटकारांची लयलूट झाली. दोन्ही संघांनी मिळून ५२३ धावा चोपल्या.

शतकवीर जॉनी बेअरस्टोने या विजयाचा पाया रचला. प्रभसिमरन सिंग, रायली रुसो आणि शशांक सिंग यांनी बेअरस्टोला तोलामोलाची साथ देत थरारक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. बेअरस्टोने ४८ चेंडूत १०८ धावांची नाबाद खेळी साकारली. शशांक सिंगने २८ चेंडूत नाबाद ६८ धावांची अविश्वसनीय खेळी साकारली.

पंजाबने प्रयोग सुरू ठेवत जॉनी बेअरस्टोच्या बरोबरीने प्रभसिमरन सिंगला सलामीला पाठवलं. हा प्रयोग यशस्वी ठरला. प्रभसिमन-बेअरस्टो जोडीने पॉवरप्लेमध्येच ९३ धावांची तडाखेबंद सलामी दिली. प्रभसिमरनने १८ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केलं. सुनील नरेनच्या अचूक धावफेकीमुळे प्रभसिमरन बाद झाला. त्याने २० चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ५४ धावांची खेळी केली. प्रभसिमरन बाद झाल्यानंतर रायली रुसोने बेअरस्टोला चांगली साथ दिली. संघातून वगळल्यानंतर कसून सराव केलेल्या बेअरस्टोने चौकार, षटकारांची आतषबाजी केली. बेअरस्टो-रुसो जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ३९ चेंडूत ८५ धावा रचल्या. सुनील नरेनने रुसोला माघारी परतावलं. त्याने १६ चेंडूत २६ धावा केल्या.

रुसोच्या जागी आलेल्या शशांक सिंगने पहिल्या चेंडूपासून केकेआरच्या गोलंदाजांना पिटाळून लावलं. एकामागोमाग एक षटकार लगावत शशांकने धावगतीचं दडपण खाली आणलं. बेअरस्टोनं ४५ चेंडूत शतक साजरं केलं. प्रचंड उकाडा आणि आर्द्रता अशा वातावरणातही बेअरस्टोने शतक झळकावलं. या स्पर्धेतलं बेअरस्टोचं हे दुसरं शतक आहे. शशांक सिंगने २८ चेंडूत २ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ६८ धावा करत पंजाबच्या स्वप्नवत विजयावर शिक्कामोर्तब केलं. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ३७ चेंडूत ८४ धावा काढल्या.

You may have missed