बीड(Beed): बीड लोकसभा2024 जरांगे फॅक्टर की मुंडे भारी? ‘बीड’ च्या गडावर कुणाचा झेंडा?

बीड लोकसभा 2024 : गेल्या तीन दशकांपासून मराठा विरुद्ध ओबीसी भोवती बीड जिल्ह्यात राजकारण सुरु आहे. यंदाची लोकसभा निवडणूक देखील त्याला अपवाद नव्हती.

बीड(Beed) :राज्यात जातीय अस्मिता टोकदार असलेल्या जिल्ह्यामध्ये बीडचा समावेश आहे. मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचे हिंसक पडसाद या जिल्ह्यात उमटले होते. गेल्या तीन दशकांपासून मराठा विरुद्ध ओबीसी भोवती बीड जिल्ह्यात राजकारण सुरु आहे. यंदाची लोकसभा निवडणूक देखील त्याला अपवाद नव्हती. विकासाच्या प्रश्नापेक्षा जातीय जाणीवा टोकदार करणारी निवडणूक म्हणून ही निवडणूक लक्षात राहणार आहे. त्यातच गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाच्या प्रमाणात 4 टक्के वाढ झालीय. मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या फायद्याचा ठरणार यावर दोन्ही बाजूंनी हिशेब सध्या केला जातोय.

बीडचा इतिहास

भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यात बीडचा समावेश होतो. राज्यात भाजपाचा विस्तार करणारे गोपीनाथ मुंडे याच जिल्ह्यातले. 1996 पासून फक्त एका निवडणुकीचा अपवाद वगळता इथून सातत्यानं भाजपाचा उमेदवार खासदार झाला आहे. स्वत: गोपीनाथ मुंडे इथून दोन वेळा निवडून गेले होते. त्यांच्या निधनानंतर प्रीतम मुंडे यांनी बीडचं प्रतिनिधित्व केलं. यंदा भाजपानं प्रीतम मुंडे यांच्या ज्येष्ठ भगिनी आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनावणे यांना मैदानात उतरवलं होतं.

जातीय प्रचार

बीडमध्ये कायमच असणारा मराठा विरुद्ध ओबीसी हा मुद्दा या निवडणुकीतही धगधगता राहिल याची काळजी दोन्ही बाजूंनी घेतली गेली. उपोषणाने कुठे आरक्षण मिळते का? हे पंकजा मुंडे यांचं विधान चांगलंच गाजलं. शरद पवारांनी बीडमधील सभेत मनोज जरांगेंची आम्ही त्यांच्या उपोषणस्थळी भेट घेतल्याची आठवण करुन देत ‘नेमका संदेश’ मतदारांना ठसवण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या प्रचारसभेत कर्नाटकमधील ओबीसी आरक्षणात मुस्लीम वाटेकरी असल्याची आठवण करुन दिली.

निवडणूक प्रचाराच्या गदारोळात मनोज जरांगे यांचे नारायणगडावर आगमन, पंकजा मुंडे यांच्या परळीमध्ये झालेल्या प्रचाराच्या सांगता सभेत उदयनराजेंची उपस्थिती, समाजमाध्यमांवर जातीय अस्मिता टोकदार करणाऱ्या संदेशांचा प्रसार या सर्व कारणामुळे ही निवडणूक लक्षात राहणार आहे.

You may have missed