डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. तब्बल 11 वर्षांनी प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. याप्रकरणी तीन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं असून दोन आरोपींना दोषी ठरवलं गेलं आहे.
Breaking News : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात तब्बल 11 वर्षांनी निकाल आला आहे. पुणे सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवलं आहे. दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर याप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना कोर्टाने निर्दोष ठरवलं आहे. तावडे, पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधातील आरोप सिद्ध होत नाही, असं कोर्टाने म्हटलं. विशेष सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं.
कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध होतंय. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी आहेत.यात फाशीची शिक्षा होऊ शकत नाही. दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली असून पाच लाखांचा दंडही भरावा लागणार आहे. तर, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, वकीस संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 च्या सकाळी सव्वासातच्या सुमारास पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पाच आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला. ज्यात वीरेंद्र तावडे, सचिन अंदूरकर, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांचा समावेश होता. यापैकी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे सध्या जामीनावर बाहेर आहेत.
कट रचल्याचा आरोप असलेल्या वीरेंद्र तावडे याला निर्दोष ठरवण्यात आल्याने दाभोलकर कुटुंबाने आश्चर्य व्यक्त केलं आहे. दोघांना शिक्षा झाली हे न्यायव्यवस्थेवरील विश्वास दर्शवते. पण सुटलेले आरोपी आहेत, त्यांच्याविरोधात आम्ही वरच्या कोर्टात धाव घेऊ, असं हमीद दाभोलकर यांनी सांगितलं.
वकिलांनी काय सांगितलं ?
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निकाल आला. एकूण पाच आरोपींना केसला सामोरं जावं लागलं. यामधील वीरेंद्र तावडे कटकारस्थानाच्या आरोपातून मुक्त केलं, संजीव पुनाळेकर यांना शस्त्र नष्ट करण्याचा आरोप होता, त्यांना निर्दोष केलं. शिवाय विक्रम भावे यांनाही निर्दोष सुनावलं.
सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा सिद्ध झाला. त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि पाच लाखांची दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. जर दंड न भरल्यास एक वर्षाची अतिरिक्त शिक्षा असेल.
जो निकाल आला आहे त्या निकालाचा आदर करतो, पण उर्वरीत आरोपींना निर्दोष सुनावण्यात आल्याने, आम्ही या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेऊ, असं दाभोलकरांच्या वकिलांनी सांगितलं.