मराठवाड्यातील नागरीकांनो पाणी जपूनच वापरा, नाहीतर भीषण जलसकंटाला सामोरे जावे लागणार

छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडीत केवळ 11 टक्के जलसाठा..पाण्याने गाठले तळ, धोक्याची घंटा…

 

जायकवाडी धरणात केवळ 11 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, मराठवाडयातील धरणांनी तळ गाठायला सुरूवात केली आहे. विभागातील 877 प्रकल्पांमध्ये आजघडीला केवळ 15.76 टक्केच पाणीसाठा शिल्लक असून मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या मराठवाडयात गेल्या वर्षीही, समाधानकारक पाऊस झालेला नाही. मात्र 2023 वर्षात मान्सूनचे उशिराने आगमन झाले. जून ते सप्टेंबर 2023 या मान्सूनच्या काळात सरासरी 84.55 टक्के म्हणजे 675.43 पावसाची नोंद झाली. मान्सूनमध्ये 15.45 टक्केची घट झाली. दरम्यान मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्याची तहान भागवणार्‍या जायकवाडी धरणांनेही तळ गाठायला सुरुवात केली असून आजपर्यंत नाथसागरात केवळ 10 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

तसेच विभागातील येलदरीसह सिध्देश्वर आणि माजलगाव, माजंरा, आणि धाराशिव जिल्ह्यातील सीने – कोळेगाव ही मोठी धरणे कोरडीच आहेत. उन्हाचा पारा वाढायला सुरुवात झाली असून, ऐन उन्हाळ्यात मराठवाड्यातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कमी पर्जन्यमानामुळे मराठवाड्यातील, पाणीसाठे अटत चालले असून, परिणामी टँकरच्या संख्येत वाढ होत आहे.

सध्याच्या स्थितीत मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ 19.12 टक्के पाणीसाठा शिल्लक असून 26 एप्रिल रोजीच्या माहिती नुसार 75 मध्यम प्रकल्पांत 7.84 टक्के; तर 749 लघुप्रकल्पांत 8.89 टक्केच पाणीसाठा आहे. गोदावरी नदीवरील 15 प्रकल्पवजा बंधार्यांमध्ये 21.35 टक्के, तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील 27 बंधार्यांमध्ये 7.945 टक्के पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पांत केवळ 10 टक्के साठा शिल्लक असून, मराठवाड्यातील 75 मध्यम प्रकल्पांत केवळ 8 टक्केच पाणीसाठा शिल्लक असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 16 प्रकल्पात केवळ 5 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

जालना येथील 7 प्रकल्पात 4 टक्के, बीडमधील 16 प्रकल्पात 15 टक्के, लातूर 8 प्रकल्पात 6 टक्के, धाराशिव मधील 17 प्रकल्पात केवळ 1 टक्के, नांदेड जिल्ह्यातील 9 प्रकल्पात 21 टक्के पाणीसाठा शिल्लक असून परभणीतील 2 मध्यम प्रकल्पात केवळ 1 टक्का पाणीसाठा आहे.

 

मराठवाड्यातील धरणांची वर्तमान जलसाठा स्थिती या प्रमाणे…

धरण स्थिती      (टक्क्यांमध्ये)
जायकवाडी       11
येलदरी             30
सिद्धेश्वर            24
मांजलगाव        00
मांजरा             04
उर्ध्व पेनगंगा    42
निम्न तेरणा       01
निम्न मनार       28
विष्णुपुरी          34
निम्न दुधना        04
सिना कोळेगाव 00