बंगळुरुने पंजाबला 60 धावांनी पराभूत केलं. यासह आरसीबीचा प्लेऑफसाठीचा श्वास अजूनही सुरुच आहे. तर पंजाब किंग्सचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे.
IPL 2024 :आयपीएल 2024 ( IPL 2024 ) स्पर्धेतील 58वा सामना पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडला. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा होता. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र बंगळुरुने पंजाब किंग्सला पराभवाचं पाणी पाजलं. या पराभवानंतर पंजाब किंग्सच स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आयसीयूतून बाहेर आली असून व्हेंटिलेटरवर आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवावा लागेल. तसेच इतर संघाच्या कामगिरीवर प्लेऑफचं गणित ठरणार आहे. गुणतालिकेत दोन संघांचे 16 गुण आहेत. तिसऱ्या स्थानावर असलेल्या हैदराबादचे 14 गुण आहेत. तर चेन्नई सुपर किंग्सचे 12 गुण आहेत. त्यामुळे दोन संघांच्या जागी संधी आहे. कारण बंगळुरुने दोन सामने जिंकले तर 14 गुण होतील आणि प्लेऑफचं गणित सुटू शकतं. बंगळुरुचा पुढचे दोन सामने दिल्ली आणि चेन्नई सुपर किंग्ससोबत आहे. हे दोन्ही संघ प्लेऑफच्या रेसमध्ये आहे. त्यामुळे बंगळुरुने हे दोन्ही सामने जिंकले तर प्लेऑफचा मार्ग सापडू शकतो.
नाणेफेकीचा कौल जिंकत पंजाब किंग्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्रथम फलंदाजी करताना 7 गडी गमवून 241 धावा केल्या आणि विजयासाठी 242 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात विराट कोहलीने जबरदस्त फलंदाजी केली. विराट कोहलीने 47 चेंडूत 92 धावा केल्या. तर रजत पाटीदार 55 आणि कॅमरोन ग्रीनने 46 धावा केल्या. पंजाब किंग्सला हे आव्हान गाठणं काही शक्य झालं नाही. पंजाब किंग्सचा संपूर्ण संघ 181 धावांवर बाद झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पंजाब किंग्सला 60 धावांनी पराभूत केलं. आरसीबीने पंजाबला पराभूत करत एकूण 10 गुणांची कमाई केली आहे. तर 60 धावांनी पराभूत केल्याने नेट रनरेटमध्येही चांगला फायदा झाला आहे.