पोलीस तपासात नवीन माहिती उघडकीस आली असून आरोपी गंगाधर दिल्ली नव्हे तर आंध्र प्रदेशात काम करत आहे
लातूर(Latur): वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट प्रकरणातील लातूरमधील आरोपी जलील पठाण याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, दुसरा आरोपी संजय जाधव यास दोन दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली आहे. या महिन्यातील 2 तारखेला संजय जाधव आणि जलील पठाण या दोघांनाही 4 दिवसाची सीबीआय (CBI) कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर आज दोन्ही आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात आले असता जलील पठाण यास 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी तर संजय जाधव यास दोन दिवसाची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीस तपासात नवीन माहिती उघडकीस आली असून आरोपी गंगाधर दिल्ली नव्हे तर आंध्र प्रदेशात काम करत आहे. बंगळुरूतील सीबीआयच्या टीमने त्याला अटक केली आहे. 10 विद्यार्थी आणि पालकांनी सीबीआयशी संपर्क साधून याबाबतची संपूर्ण माहिती दिली आहे. कशाप्रकारे संजय जाधव आणि जलील पठाण हे त्यांच्याकडून पैसे घेत होते. हे पैसे पुढे गंगाधरला पाठवले जायचे. त्यासाठी मध्यस्थ होता तो इराण्णा कोंगलवार. त्यामुळे, पोलिसांकडून संजय जाधव जलील पठाण आणि इराण्णा कोंगलवार यांचे बँक व्यवहार तपासण्यात आले आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याचे समोर आले आहे.
सीबीआयने मागितली आणखी कोठडी
सीबीआयच्या तपासात काही माहिती समोर आल्यानंतर सीबीआयच्या तपास पथकाने आता आरोपींची आणखी दोन दिवसांसाठी कोठडी वाढून मागितली. मात्र, न्यायालयाने जलील पठाण यास 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील दुसरा आरोपी संजय जाधव यास दोन दिवस वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली आहे. संजय जाधव आणि गंगाधर यांचे थेट व्यवहार झाले आहेत. पुढील तपास करण्यासाठी संजय जाधव आणि गंगाधर यांचे एकत्रित तपास आवश्यक असल्याचं कारण देत सीबीआयने दोन दिवसाची पोलीस कोठडी वाढवून मागितली होती. त्यानुसार, न्यायालयाने संजय जाधव यास दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे.
कोर्टामध्ये आज सीबीआय पथकासह सीबीआयचे वकील आणि आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला. आरोपीची वकील अडवोकेट बळवंत जाधव यांनी युक्तिवाद करताना स्पष्ट केलं की, 24 तारखेपासून आरोपी पोलिसांच्या कोठडीत आहेत, ते तपासाला सहकार्य करतील. आरोपींकडे असलेली सर्व माहिती त्यांनी सीबीआय आणि लातूर पोलिसांनाही दिली आहे. नीट यंत्रणा चालवणाऱ्याशी थेट यांचा संबंध नाही, जो माणूस मध्यस्थ होता, तो गंगाधर सीबीआयच्या अटकेत आहे. आता पुढील माहिती तो देऊ शकतो. त्यामुळे आरोपींना वाढीव पोलीस कोठडी देणे आवश्यक वाटत नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने केला होता.
काय होतं लातूर नीट प्रकरण….
लातूर पोलिसांनी नीट पेपर फुटी प्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या चार जणांपैकी दोन जणांना अटक करण्यात लातूर पोलिसांना यश आला आहे. त्यात जलील पठाण आणि संजय जाधव यांचा समावेश आहे. फरार इराण्णाचा शोध सुरू आहे. या चार जणांनी मिळून लातूर मधील अनेक विद्यार्थ्यांना परराज्यामध्ये नीट परीक्षा देण्यासाठी तयार केलं होतं. त्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचं बोललं जातंय. आरोपींच्या मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांचे बारा एडमिट कार्ड सापडले आहेत. त्यापैकी आठ ऍडमिट कार्ड हे परराज्यातील आहेत. या आठ ऍडमिट कार्डपैकी सात एडमिट कार्ड बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे असून एक ऍडमिट कार्ड लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्याचे आहे. या टोळीचे कनेक्शन्स देशातील कोणत्या राज्यात आहेत, याचा तपास सीबीआय करणार आहे.
More Stories
छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar):शहरातील सिडको परिसरात असलेल्या काळा गणपती मंदिरासमोर आज भीषण अपघात
मालवण(Malvan):जयदीप आपटेचे वकील सिंधुदुर्गात दाखल, स्ट्रॅटेजी तयार, जामीन मिळवण्यासाठी पडद्यामागे हालचाली? जयंत पाटलांचा गंभीर आरोप
Bangladesh Violence:कधीकाळी अख्खं कुटुंब संपलं, पण शेख हसीना थोडक्यात बचावल्या, भारतानं दिलेला आश्रय; इंदिरा गांधींसोबत खास कनेक्शन