महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी दाखल केलेल्या त्यांच्या दुसऱ्या शपथपत्रात पत्नीच्या नावे जालना व जळगाव येथे देशी व विदेशी मद्यविक्रीचे परवाने असल्याची नवीन माहिती शपथपत्रात दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर : महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी दाखल केलेल्या त्यांच्या दुसऱ्या शपथपत्रात पत्नीच्या नावे जालना व जळगाव येथे देशी व विदेशी मद्यविक्रीचे परवाने असल्याची नवीन माहिती शपथपत्रात दिली आहे. स्वत:च्या उत्पन्नाचा स्रोत शेती, मानधन आणि भाडे असे दर्शविले असून पत्नीच्या उत्पन्नाचे स्रोत शेती आणि मद्यविक्री व्यवसाय असा नमूद करण्यात आला आहे. दुसऱ्या शपथपत्रातील या माहितीमुळे मद्य परवान्यांच्या चर्चेला राजकीय पटलावर नवीन फोडणी मिळाली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्याच दिवशी संदीपान भुमरे यांनी एक अर्ज दाखल केला होता. त्यासोबत दिलेल्या शपथपत्रात मद्यविक्री परवान्याबाबतची माहिती देण्यात आली नव्हती. नव्याने दिलेल्या शपथपत्रात जालना येथे एफ.एल.(फॉरेन लिकर ७) नंतर फॉरेन लिकर, कंट्री लिकर-३ हे परवाने जालन्यासाठी तर जळगावसाठीही याच पद्धतीचे दोन परवाने पत्नीच्या नावावर असल्याची माहिती नमूद करण्यात आली आहे.