Loksabha Election 2024 : ५० टक्क्यांची मर्यादा आमचे सरकार आल्यास हटवून टाकू – राहूल गांधी

राहुल गांधी यांनी भाजपाच्या ४०० पार घोषणेवरही टीका केली…

 

Loksabha Election 2024 : आरक्षणाच्या मागणीसाठी देशभरातील विविध राज्यांमध्ये मोठी आंदोलने झालेली पाहायला मिळाली आहेत. महाराष्ट्रातही मराठा आरक्षणासह इतर जातसमूहाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमिवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मोठी घोषणा केली. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा आमचे सरकार आल्यास हटवून टाकू, असे राहूल गांधी म्हणाले. या निर्णयाचा लाभ दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी जमातींना होणार असल्याचेही ते म्हणाले.

रतलाम येथील सभेला संबोधित करत असताना राहुल गांधी म्हणाले, “ही निवडणूक संविधानाला वाचविणारी निवडणूक ठरणार आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघ संविधानाला संपवू इच्छितो. यासाठी त्यात बदल करणार असल्याचे त्यांचे नेते सांगतात. काँग्रेस आणि इंडिया आघाडी संविधानाचे रक्षण करण्याची लढाई लढत आहे. संविधानाचे इथल्या लोकांना जल, जमीन आणि जंगल या साधनसंपत्तीवर अधिकार दिले. नरेंद्र मोदींना हे अधिकार हिसकावून घ्यायचे असल्यामुळेच त्यांना पूर्ण बहुमत हवे आहे.” राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत हातात घेऊन हा मुद्दा लोकांना सांगितला.

 

राहुल गांधी यांनी भाजपाच्या ४०० पार घोषणेवरही टीका केली. ते म्हणाले, भाजपाच्या नेत्यांनी संविधान बदलण्यासाठी ४०० जागा जिंकून द्या, असे आवाहन केले आहे. पण ४०० विसरा, त्यांना आता १५० जागाही जिंकणे अवघड झाले आहे. ते सांगतात की, सत्तेत आल्यानंतर आरक्षण हटवू. पण मी आज या मंचावरून जाहीर करतो की, आरक्षण कुणी हटवू शकत नाही. उलट आम्ही जर सत्तेत आलो तर आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्याही पुढे नेऊ. गरिब, दलित, वंचित आणि आदिवासींना अधिकाधिक आरक्षण देण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली.

You may have missed