राज ठाकरे आता या आनंदाश्रमाला भेट देणार असल्याने शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Loksabha Election 2024: महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे(raj thackeray) हे रविवारी ठाण्यात येणार आहेत. राज ठाकरे यांची कळवा येथील ९० फूट रोड परिसरात सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेपूर्वी ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभी नाका येथील आनंद आश्रमात आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेणार आहेत. आनंद दिघे हे राज ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. राज ठाकरे ठाण्यात येत असल्याने मनसैनिकांबरोबरच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. तसेच दिघे यांचा खरा शिष्य कोण? या वादावर आता राज ठाकरे हे सभेतून पडदा टाकणार असल्याचा दावा शिवसेनेचे पदाधिकारी करत आहेत.
शिवसेनेचे दिवंगत नेते ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे आणि राज ठाकरे यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेकडून नरेश मस्के( naresh mhaske ) तर कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे (shrikant shinde )यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. काही दिवसांपूर्वी या दोन्ही उमेदवारांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन सभा घेण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत राज ठाकरे यांनी सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. रविवारी सायंकाळी कळवा येथील ९० फूट रोड परिसरात राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची तयारी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरू झाली आहे.
सभेला जाण्यापूर्वी राज ठाकरे हे टेंभी नाका येथील आनंदाश्रमाला भेट देणार आहेत. आनंद दिघे हे या आनंद आश्रमात राहत होते. येथून पूर्ण ठाणे जिल्ह्याचा कारभार हाकत होते. या आनंद आश्रमात ते जनता दरबार भरवत असे. तसेच नागरिकांच्या समस्या सोडवीत होते. राज ठाकरे आता या आनंदाश्रमाला भेट देणार असल्याने शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ रविवारी दुपारी ४.३० वाजता राज ठाकरे आनंद आश्रमाला भेट देणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांबरोबरच महायुतीचे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं व मित्र पक्षांचे कार्यकर्ते देखिल यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली.
शिवसेनेत भारतीय विद्यार्थी सेनेचे राज ठाकरे हे अध्यक्ष असताना नरेश म्हस्के यांच्यावर विद्यार्थी सेनेची ठाणे जिल्ह्याची जबाबदारी होती. राज ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले धडाडीचे कार्यकर्ते म्हणून नरेश म्हस्के यांची ओळख आहे. ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार म्हणून नरेश म्हस्के यांचे नाव जाहीर झाल्यावर नरेश म्हस्के यांनी राजगड येथे जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते. तेव्हा ठाणे लोकसभा क्षेत्रातील मनसैनिक नरेश म्हस्के यांच्या पाठिशी खंबीर उभे राहणार असल्याची ग्वाही दिली होती. रविवारी राज ठाकरे काय बोलणार? यावर सगळ्यांचे आता लक्ष आहे.
More Stories
नवी दिल्ली(New Delhi):संसदेत आज अर्थसंकल्पावरुन घमासान, राहुल गांधी काय बोलणार?
केंद्रीय अर्थसंकल्प(Union Budget 2024):विधानसभा निवडणूक असूनही महाराष्ट्राला अर्थसंकल्पात काहीच का मिळालं नाही, भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाच्या कृतीचा नेमका अर्थ काय?
नवी दिल्ली(New Delhi): 23 जुलै रोजी सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प, 22 तारखेपासून अधिवेशनाला सुरुवात होणार