माढा(Madha): माढ्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी वाद पेटला? विधानसभेत ‘खेला’ होणार?

अनेक मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप उमेदवाराचे काम केले नाही असा आरोप आता भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून केले जात आहेत.

माढा(Madha): लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या खटके उडताना दिसत आहेत. अनेक मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप उमेदवाराचे काम केले नाही असा आरोप आता भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून केले जात आहेत. माढ्यात हा वाद आता वाढताना दिसतोय. भाजपचे माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले आहेत. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत कोणत्याही स्थिती राष्ट्रवादीचे काम करणार नाही अशी भूमीकाच घेतली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्माण झालेली ही दरी कशी भरून काढायची यासाठी महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांचा कस लागणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवारांच्या पराभव बाबत भाजपा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह अजित पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार बबन शिंदे , आमदार संजयमामा शिंदे आणि दीपक साळुंखे हे जबाबदार असल्याचा थेट आरोप भाजपचे माढा लोकसभा संयोजक जयकुमार शिंदे यांनी केला आहे. भाजप आमदार असलेले मोहिते पाटील यांनी आपले चुलत बंधू धैर्यशील यांच्या विजयासाठी काम केले. तर राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या शिंदे बंधूंनीही तुतारीचेच काम केले. त्याला दीपक साळुंखे यांचीही साथ मिळाली. आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून करमाळा, माढा आणि सांगोला तालुक्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तुतारी सोबत तडजोडी केल्याचा आरोप केलाय.

रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेतील आमदार आहेत. त्यांची आमदारकी पक्षाने रद्द करावी अशी मागणीही भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलीय. शिवाय येवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार करणार नाहीत असा इशाराही दिला आहे. भाजपच्या नेत्यांनी घेतलेल्या या भूमीकेमुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.

माढा(Madha) लोकसभेतल्या करमाळा, माढा, आणि फलटण विधानसभेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. करमाळ्यातून संजयमामा शिंदे, माढ्यातून बबन शिंदे तर फलटण मधून दिपक चव्हाण हे आमदार आहे.  या तिनही मतदार संघातून माढा लोकसभेसाठी भाजप उमेदवाराला लिड मिळाले नाही. हे भाजपने आता आकडेवारी वरून समोर आणले आहे. शिवाय सांगोल्यात राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे आहेत. मात्र त्यांनाही अपेक्षित लिड देता आले नाही.

You may have missed