mcnnews.tv

मुंबई(Mumbai):दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना मोठा दिलासा, मुंबई पोलिसांची कोर्टात महत्त्वाची माहिती

भाजपचे नेते नारायण राणे आणि नितेश राणे यांनी सातत्याने दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. दिशाचा बलात्कार आणि खून झाल्याचा दावा त्यांनी केला होता.

मुंबई(Mumbai):दिशा सालियन मृत्यूप्रकरणी तिचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी हायकोर्टानं राज्य सरकारला दोन आठवड्यांची अंतिम मुदत दिलीय. बुधवारी या प्रकरणावर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याप्रकरणी हायकोर्टानं राज्याच्या मुख्य सचिवांना उत्तर देण्याचे आदेश दिलेले असतानाही मालवणी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी उत्तर दिल्याची बाब याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच या प्रकरणी आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेवरही सतीश सालियन यांच्यावतीनं वकील निलेश ओझा यांनी कोर्टात उत्तर दाखल केलं आहे. ज्यात आदित्य ठाकरे हेच या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्यानं त्यांना यात याचिका दाखल करण्याचा अधिकारच नसून त्यांची याचिका फेटाळून लावण्याची विनंती करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांकडून याचिका फेटाळण्याची विनंती करण्यात आली आहे. याप्रकरणी तपासाची प्राथमिक फेरी पूर्ण झालेली आहे. दिशाचा मृत्यू हा अपघाती असून, त्यात कोणताही घातपाच किंवा हत्येचा प्रयत्न झाल्याचं आढळून आलेलं नाही. म्हणून दिशाच्या (Disha Salian Case) मृत्यूची अपघाती नोंद करत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नसल्याचं सांगत मालवणी पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी प्रतिज्ञापत्र सादर करीत याचिका फेटाळून लावण्याची विनंती हायकोर्टाकडे केली आहे.

राज्य सरकारकडून उत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ – यासंदर्भात सीबीआय तपासाबाबत भूमिका स्पष्ट करण्याकरिता आणखीन थोडा अवधी देण्यात यावा, अशी विनंती सरकारी वकील प्राजक्ता शिंदेंनी कोर्टाकडे केली, जी स्वीकारत हायकोर्टानं राज्य सरकारच्या विनंतीवर या प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांकरिता तहकूब केली. त्यामुळे याबाबत आता त्यांची काय भूमिका आहे?, यावर महाराष्ट्राच्या राजकारणाची अनेक समीकरणं अवलंबून आहेत.

Disha Salian death case: सतीश सालियन यांच्या याचिकेतील आरोप काय?

दिशा तिच्या करिअरसाठी खूप गंभीर होती, ती अशी आत्महत्या करणं शक्यच नाही. माझ्या मुलीचा मृत्यू हा अपघाती झाला असं मला त्यावेळी भासवण्यात आलं. मात्र, तिचा मृत्यू हा अपघाती नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि मालवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी ते सांगत असलेली गोष्टच खरी असल्याचं सतत आपल्यापुढे रेटत होते. याच लोकांनी माझ्या कुटुंबाला सतत दबावाखाली आणि नजरकैदेत ठेवलं होतं, आमच्या प्रत्येक हालचालींवर त्यांची नजर होती, असा आरोपही सालियन यांनी आपल्या याचिकेतून केला आहे. मुंबई पोलिसांनी दिशाचा सामूहिक बलात्कार आणि हत्या दडपण्यासाठी सारे साक्षी पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, शवविच्छेदन अहवाल या साऱ्या गोष्टी बनावट तयार केल्याचा दावाही या याचिकेतून करण्यात आलाय.

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंवर याचिकेतून गंभीर आरोप

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबानुसार, 8 जून 2020 च्या त्या रात्री दिशाच्या मालवणी येथील घरात तिच्या जवळच्या मित्रांसह एक पार्टी सुरू होती, मात्र अचानक तिथं आदित्य ठाकरे, त्यांचा एक अंगरक्षक, सूरज पांचोली, दिनो मौर्या ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीचा माहोलच बदलला. याच लोकांनी दिशाचा सामूहिक बलात्कार केल्याचा गौप्यस्फोटही सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी वारंवार केलेला आहे. या घटनेनंतर दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणारं होतं म्हणून तिला कायमचं शांत करण्यात आलं. या घटनेनंतर अनेक राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले होते. या घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरून सतत संपर्कात होते. याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोनकॉल्स केले. दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांससिंह राजपूत याचाही मृत्यू झाला याच कालावधीत सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीसोबत आदित्य ठाकरेंनी 44 वेळा फोनवर बोलणं केल्याचाही आरोप याचिकेत आहे.

Mumbai Police: दिशाचा संशयास्पद मृत्यू आणि मुंबई पोलिसांच्या तपासावर सवाल

दिशाचा मृतदेह बंद दाराआडून हलवून तो बाहेर फेकण्यात आला. तिनं 14 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केलाचा दावा केला गेलाय. मात्र दिशाच्या मृतदेहावर घटनेशी साधर्म्य दाखवणाऱ्या कुठल्याही खुणा नव्हत्या. गँगरेपच्या खुणा मिटवण्यासाठीच मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात 50 तासांचा उशीर केला. दिशाचा मृतदेहदेखील आम्हाला फारकाळ ठेवू दिला नाही, घाईघाईत त्याचे अंत्यसंस्कार करण्यास भाग पाडण्यात आलं. घटनेच्या दिवशीच त्या इमारतीचे आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज रहस्यमयरीत्या गायब करण्यात आले. तिथं असलेल्या अनेकांचे मोबाईल लोकेशन, सीडीआर यांची नोंदच घेतली गेली नाही, असे आरोप करीत या याचिकेत मुंबई पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेय.

हे सर्व माहिती असूनही राज्याचे प्रमुख या नात्यानं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही, उलट घडलेली घटना, संबंधित व्यक्त आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं. त्यामुळे त्यांचीही याप्रकरणी चौकशी झाली पाहिजे. आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, संबंधित पोलीस अधिकारी आणि डॉक्टर्स यांना ताब्यात घेऊन त्यांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर चौकशी होणं गरजेचं आहे. या प्रकरणी विशेष सरकारी वकील नेमून त्यांच्या देखरेखीखाली भक्कम केस तयार करावी आणि एनआयए किंवा सीबीआयमार्फत कोर्टाच्या देखरेखीखाली हा सर्व तपास करावा या याचिकेतील प्रमुख मागण्या आहेत.

Exit mobile version