महायुतीत असताना आमचं ज्याच्या जागा जास्त त्याच्या मुख्यमंत्री असं धोरण होतं. मात्र त्यात असं व्हायच एकमेकांचे उमेदवार कसे पाडले जातील असा प्रयत्न होत होता, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
मुंबई(Mumbai):विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज महाविकास आघाडीने फोडला. महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा आज मुंबईत पार पडला. या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. व्यासपीठावर शरद पवार, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण असे तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित असताना मुख्यमंत्रिपदाचं एक नाव जाहीर करा, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मी होणार की आणि कुणी होणार? हा प्रश्न होता. आता पृथ्वीराज चव्हाण, शरद पवार यांनी इथे एक नाव जाहीर करावं. माझा तुमच्या निर्णयाला पाठिंबा असेल. मुख्यमंत्रिपदाबाबत विरोधकांकडून काडी पेटवली जात आहे. आपल्यात मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून वाद लावले जात आहेत.
महायुतीत असताना आमचं ज्याच्या जागा जास्त त्याच्या मुख्यमंत्री असं धोरण होतं. मात्र त्यात असं व्हायचं एकमेकांचे उमेदवार कसे पाडले जातील असा प्रयत्न होत होता, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
महाविकास आघाडीत जागा वाटपावरून नाराजी नाट्य नसलं पाहिजे. केवळ आमचा उमेदवार आहे म्हणून काम करायचं नाही असं करून चालणार नाही, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांचं नाव न घेता लगावला.