मुंबई(Mumbai): कोस्टल रोडसाठी ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार? काय आहे कारण?

मुंबई(Mumbai): मुंबई कोस्टल रोड पूर्णपणे सेवेत येण्यासाठी प्रवाशांना आणखी पाच महिन्यांची  प्रतीक्षा करावी लागणार आहे. काय आहे कारण?

मुंबई(Mumbai) कोस्टल रोड पूर्णपणे सेवेत येण्यासाठी प्रवाशांना आणखी पाच महिन्यांची  प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण मरीन ड्राईव्ह ते वरळीपर्यंतचा संपूर्ण कोस्टल रोड सुरू होण्यास ऑक्टोबर महिना उजाडणार असल्याचे म्हटले जात आहे. वरळीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम, सुशोभिकरण आणि काही प्रमाणात डांबरीकरण पूर्ण होण्यासाठी ऑक्टोबरपर्यंतचा वेळ लागण्याचा अंदाज आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह कोस्टल रोडच्या अधिकाऱ्यांकडून जानेवारी 2024 मध्ये कोस्टल रोड संपूर्णपणे सेवेत येण्यासाठी मे  2024ची डेडलाइन दिली गेली होती. पण मे महिना संपत आला असतानाही कोस्टल रोडचे काम केवळ 89 टक्केच पूर्ण झालं आहे. 11 टक्के काम पूर्ण होणे बाकी असल्याचे म्हटले जात आहे.

रिपोर्ट्सनुसार, यामध्ये हाजी अली मार्ग ते वरळीकडे जाणाऱ्या मार्गाचेही काम पूर्ण न झाल्याने मान्सूनदरम्यान डांबरीकरणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, कोस्टल रोडचा मरीन ड्राईव्हपासून ते उत्तरेकडे जाणारा मार्ग 10 जूननंतर सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

बोगद्यातील गळतीची पाहणी करण्यासाठी आलेले असताना त्यांनी ही माहिती सांगितली होती. डिसेंबर 2018पासून कोस्टल रोडच्या बांधकामास सुरुवात झाली होती. यादरम्यान कोस्टल रोडसाठी  वर्ष2022पर्यतची मुदत देण्यात आली होती. पण अद्याप बरेच काम बाकी असल्याने नवीन मुदतीमध्ये तरी संपूर्ण कोस्टल रोड बांधून तयार होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.