नवी दिल्ली(New Delhi):पवार विरहीत राजकारणाचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न ? दूरदृष्टी ठेवत दिल्ली दौऱ्याची आखणी!

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचे नीट आकलन केल्यास हा दौरा त्यांनी दूरदृष्टी ठेवून आखल्याचे दिसू लागले आहे.

नवी दिल्ली(New Delhi):शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुखउद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असून ते या दौऱ्यादरम्यान प्रामुख्याने काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकांमध्ये चर्चा झाली. महायुतीचे सगळे निर्णय दिल्लीत होतात, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना आता दिल्लीश्वरांचे आशीर्वाद घेण्यासाठी दिल्लीला धावावे लागते अशी टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावरून शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचे नीट आकलन केल्यास हा दौरा त्यांनी दूरदृष्टी ठेवून आखल्याचे दिसू लागले आहे. यातील एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे शरद पवार विरहीत राजकारणाचा

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेच्या संजय राऊत यांनी पुढाकार घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसलाही मविआमध्ये सामील करून घेतलं होतं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये इतरांपेक्षा सरस कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीमध्येही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला उत्तम यश मिळेल असे आडाखे बांधले जात आहेत. तसे झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्या तर साहजिकच मुख्यमंत्रीपद त्यांच्या वाटेला जाणार आहे.

मविआमधील काँग्रेस हा देशपातळीवर मोठा भाऊ आहे. मात्र राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत.  ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भविष्य डोळ्यासमोर ठेवत काळजीपूर्वक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.  भाजपला अंगावर घ्यायचे असेल तर राष्ट्रीय पातळीवर मोठा भाऊ असलेल्या काँग्रेसची गरज अधिक भासणार आहे. महाराष्ट्रासोबतच देशात आपला पक्ष पसरवायचा असेल तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा काँग्रेसची मदत होऊ शकते हे उद्धव ठाकरेंना चांगले ठावूक आहे. राज्याचे मुख्यमंत्रीपद आपल्याकडे यावे, सोबतच महाराष्ट्राप्रमाणे देशात विस्तार करता यावा आणि केंद्रातही(New Delhi) चांगले स्थान निर्माण करता यावे यासाठी उद्धव ठाकरेंनी हा दौरा हाती घेतल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघावरून तिढा निर्माण झाला होता. शिवसेनेने आपला उमेदवार परस्पर जाहीर करून टाकल्याने महाराष्ट्र काँग्रेसचे नेते जाम भडकले होते. पार दिल्ली दरबारी जाऊन त्यांनी शिवसेनेविरोधात तक्रारी केल्या मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. याचे कारण म्हणजे संजय राऊत यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी अत्यंत जवळकीचे संबंध निर्माण केले आहेत. हे संबंध आणखी बळकट करण्याच्या उद्देशाने उद्धव ठाकरे यांनी हा दिल्ली दौरा आखल्याचे सांगण्यात येत आहे. याच दिल्ली(New Delhi) दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या उपस्थितीत विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांची भेट घेत महाराष्ट्रातील काँग्रेसला जो संदेश द्यायचा आहे तो व्यवस्थित दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘मुख्यमंत्री व्हायला आवडेल का ?’ या प्रश्नावर सांकेतिक उत्तर दिले.  ठाकरे यांनी म्हटले की, “मविआच्या घटकपक्षांचे म्हणणे आहे की मी मुख्यमंत्री असताना उत्तम काम केले होते. (मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असावा याबाबत) त्यांनाच विचारा. सगळे मिळून मुख्यमंत्री पदासाठी माझा चेहरा पुढे करणार तर मला कोणताही आक्षेप नाहीये. ” उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यात आणखी एक गोष्ट लक्षणीय ठरली ती म्हणजे रश्मी ठाकरेंचीही उपस्थिती. रश्मी ठाकरे या शिवसेनेच्या असा प्रकारच्या दौऱ्यात सहसा दिसून येत नाहीत. मात्र या दौऱ्यासाठी त्या देखील दिल्लीला पोहोचल्या होत्या.

You may have missed