4 जून रोजी होणार मतमोजणी :
संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या नांदेड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दिनांक 26 एप्रिल रोजी मतदान पार पडले असून या निवडणुकीत भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी काट्याची टक्कर झाली भाजपा महायुतीच्या वतीने प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या विरुद्ध काँग्रेस महाविकास आघाडीचे वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्यामध्ये लढत झाली असल्याचे बघावयास मिळाले .
भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठिकठिकाणी प्रचार सभा झाल्या तर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावून प्रचार केला . मात्र काँग्रेस उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची प्रचार सभा झाली सर्वसामान्य मतदारांचा कल काँग्रेसच्या बाजूने असल्याची चर्चा अनेक ठिकाणी ऐकावयास मिळाली. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अॕडोकेट अविनाश भोसीकर हे उमेदवार होते त्यांच्या उमेदवारीचा कोणाला फटका बसणार हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे .
26 एप्रिल रोजी रखरखत्या उन्हामध्ये मतदान होत असताना बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रावर मतयंत्र फोडण्याचा प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले 18 लाख 51 हजार 843 मतदारांपैकी 11 लाख 28 हजार 570 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून 60.94% मतदान झाले .
आता ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणी पर्यंत उमेदवारांसह सर्वच राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा जीव टांगणीला लागला असल्याचे बोलल्या जात आहे . दरम्यान मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळपर्यंत मतदार संघातील सहा विधानसभा क्षेत्रातील मतयंत्र नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात स्ट्रॉंग रूम मध्ये पोहोचले .निवडणूक निरीक्षक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत , उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम सीलबंद करण्यात आली आणि या परिसरात तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था लावली असून ४ जून पर्यंत कायम राहणार आहे चार जून रोजी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातच मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे .