PM Modi : मोदींनी वाराणसीतून दाखल केला उमेदवारी अर्ज; गंगा पूजन आणि कालभैरवाचा आशीर्वाद घेत झाले भावुक

लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी पार पडले आहे. आता पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत. आज नरेंद्र मोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधान मोदी हे वाराणसीमधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्याआधी गंगा पूजन आणि कालभैरवाचा आशीर्वाद घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीमधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याआधी गंगा पूजन करत वाराणसीबरोबरचे गेल्या १० वर्षांचे ऋणानुबंध आठवत शेअर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी काहीसे भावूक झाले. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी भावना व्यक्त करताना आई गंगा मातेने मला दत्तक घेतले असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच काशीशी असलेले ऋणानुबंध सांगत मोदी भावूक झाले. तसेच लोकांचे माझ्यावरील प्रेम पाहून माझ्या जबाबदाऱ्या दिवसेंदिवस वाढत असल्याचंही त्यांनी म्हटलं

पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये काय म्हटलं?

“बाबा विश्वनाथांच्या नगरीतील देवरूप जनतेला वंदन आणि नमस्कार! आज माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक क्षण हा काशीच्या प्रत्येक कणाला नमस्कार करत आहे. आजच्या रोड शोमध्ये मला तुमच्या सर्वांकडून मिळालेला स्नेह आणि आशीर्वाद खूप अतुलनीय आहेत. त्यामुळे मी भारावून गेलो आहे आणि काहीसा भावूकही झालो आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या सावलीत १० वर्षे कशी गेली कळलेच नाही. गंगा मातेने मला बोलावले होते. आज आई गंगेने मला दत्तक घेतले आहे”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

दिग्गज नेत्यांची उपस्थिती

पंतप्रधान मोदींनी अर्ज दाखल केला, यावेळी वाराणसीमध्ये एनडीएमधील दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह आदी भाजपाचे नेतेही उपस्थित होते.

You may have missed