पुणे(Pune):चिऊ मला माफ कर, लेकरांची काळजी घे:मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या, प्रसाद देठे यांनी पुण्यात संपवले जीवन.

पुणे(Pune): बीड लोकसभा निवडणुकीतील पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर गेल्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या होत्या. या घटना ताज्या असतानाच आता एका मराठा आंदोलकाने आयुष्याची अखेर करुन घेतल्याची माहिती समोर आली आहे. प्रसाद देठे असे या तरुणाचे नाव आहे. मूळचे बार्शीतील असणारे प्रसाद देठे पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करत होते. त्यांनी मराठा आरक्षणाच्यामागणीसाठी त्यांनी बुधवारी सकाळी आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत प्रसाद देठे यांनी आपल्या मनातील व्यथा मांडली आहे.

प्रसाद देठे यांच्या जाण्याने सामाजिक व सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त होत आहे. लिहिलेल्या चिठ्ठीत ‘फक्त मराठा आरक्षण मिळावे’, याच हेतूने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्याला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु झाल्यानंतर प्रसाद देठे हे सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय होते. ते सोशल मीडियावर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सातत्याने पोस्ट टाकायचे. त्यांनी अनेकदा फेसबुक लाईव्ह करुन मराठा आरक्षणाची भूमिका हिरीरिने मांडली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. जरांगे पाटील जिंदाबाद
लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे , आणि मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

प्रसाद देठे यांनी सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

जयोस्तु मराठा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला.  हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे.

जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे.  धीट रहा.

मला माफ करा.

तुमचाच प्रसाद

You may have missed