Jayant Patil: शरद पवारांचं पुत्री प्रेम कधीच दिसलं नाही’, सुप्रिया सुळेंच्या समोरच जयंत पाटील यांचं विधान

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या फुटीला शरद पवार यांचे पुत्रीप्रेम कारणीभूत असल्याची टीका केली. तसेच शिवसेनेच्या फुटीला उद्धव ठाकरेंचे पुत्रप्रेम कारणीभूत असल्याचे म्हटले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भूमिका व्यक्त केली आहे. एपीबी माझा वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात जयंत पाटील यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी प्रेक्षकांमध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे बसले होते. त्यांच्यासमोरच जयंत पाटील यांनी पुत्र आणि पुत्रीप्रेमाबद्दल भाष्य केले.

जयंत पाटील काय म्हणाले?

“शरद पवार यांचे पुत्री प्रेम तर आम्हाला अजिबातच अनुभवायला आले नाही. कारण तीन टर्म खासदार असलेल्या मुलीला कधीही मंत्रीपद देण्यात आले नाही. मुलीला मंत्रीपद दिले असते तर बरेच प्रसंग टळले असते. सरकार असताना शरद पवार यांनी दुसऱ्या खासदारांना संधी दिली. हे जगजाहीर आहे. त्यामुळे पुत्रीप्रेमाचा आरोप होण्याचा प्रश्नच येत नाही”, असे विधान जयंत पाटील यांनी केले.

सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्यावर होणाऱ्या आरोपाबद्दलही जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, आमच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे मंत्री होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री या नात्याने निर्णय घेत असताना त्यात आदित्य ठाकरेंचा कधीच समावेश नव्हता. त्यामुळे पुत्रप्रेमाचा आणि पुत्रीप्रेमाचा आरोप खोटा आहे.

विरोधकांकडून प्रचारावर वारेमाप खर्च

लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून काही मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. पराभव समोर दिसत असताना खर्चाच्या मर्यादेत प्रचंड वाढ झाल्याचे यंदाच्या निवडणुकीत दिसत आहे. हा खर्च १०० ते १५० कोटीच्या घरात गेल्याचे आकडे मी ऐकत आहे. प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचून किती माणसे आहेत, हे पाहून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या निवडणुकीत झालेला मी अनुभवत आहे. यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत असे कधीच झाले नव्हते. निवडणूक आयोगाने मात्र डोळे झाकून घेतल्याचे दिसत आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

You may have missed