Typing Exam 2024 : संगणक टंकलेखन परीक्षेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर न जाता बाहेरून परीक्षा देत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
बुलढाणा(Buldhana): येथे संगणक टंकलेखन परीक्षेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. ऑनलाईन असलेली परीक्षा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर न जाता बाहेरून देत असल्याचा धक्कादायक प्रकार चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरु होता. मात्र राज्य शिक्षण मंडळाच्या सतर्कतेने घोटाळा उघडकीस आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची इंग्रजी विषयाची संगणक टंकलेखन परीक्षा सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातही या परीक्षेचे सात केंद्र आहेत. काल (दि. 14) परीक्षा सुरू असताना चिखली येथील अनुराधा इंजीनियरिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात 22 विद्यार्थी परीक्षेला बसलेले असताना परीक्षा केंद्रात मात्र 14 विद्यार्थी परीक्षा देत होते. मात्र पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्यालयात प्रत्यक्ष 22 विद्यार्थ्यांनी अॅक्सेस घेतल्याचं दिसून आले.
22 विद्यार्थी परीक्षेला बसले असताना 14 विद्यार्थी हजर
त्यावेळी शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांनी परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुखांना व्हिडिओ कॉलद्वारे परीक्षा केंद्रातील विद्यार्थी दाखवण्यास सांगितलं. मात्र त्यावेळी परीक्षा केंद्रावर फक्त चौदाच विद्यार्थी परीक्षा देत होते व इतर आठ विद्यार्थी कुठे आहेत असं विचारलं असता केंद्रप्रमुख निरुत्तरित झालेत. मात्र प्रत्यक्षात 22 ही विद्यार्थी परीक्षेला बसल्याचं ऑनलाइन अॅक्सेस दिसत होता. याचा अर्थ इतर आठ विद्यार्थी हे घरून किंवा इतर कुठून तरी परीक्षा देत होते.
विद्यार्थी बाहेरून परीक्षेला जॉईन कसे झाले?
या परीक्षेचा युजर आयडी व पासवर्ड हा फक्त केंद्र प्रमुख यांच्याकडेच असतो. तरीही हे विद्यार्थी बाहेरून परीक्षेला जॉईन कसे झाले? त्यामुळे बुलढाणा(Buldhana)जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळ हे केंद्र गाठून हा सगळा गैरप्रकार उघडकीस आणला. बुलढाणा जिल्ह्यातील सातही परीक्षा केंद्रावर अशाच प्रकारे हा घोटाळा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या कानावर हा विषय घालण्यात आला.
शिक्षणाधिकाऱ्यांची पोलिसात तक्रार
याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी पोलिसात तक्रार दिली असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया बुलढाणा(Buldhana) शहर पोलीस स्टेशन येथे सुरू आहे. देशभरात नीट परीक्षेचा घोटाळा गाजत असताना आता राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संगणक टंकलेखन परीक्षेचा हा मोठा घोटाळा समोर येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात जरी हा घोटाळा समोर आला असला तरी राज्यभर काय परिस्थिती आहे? याची चौकशी केल्यानंतरच हा घोटाळा आता उघड होणार आहे.
More Stories
नाशिक(Nashik):नाशिकमध्ये जोरदार पाऊस! गोदावरीच्या पाणीपातळ्यात वाढ, 9 धरणांमधून विसर्ग सुरु
छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar):शहरातील सिडको परिसरात असलेल्या काळा गणपती मंदिरासमोर आज भीषण अपघात
नागपूर(Nagpur):ठाकरे पिता-पुत्रांना खोट्या प्रकरणांत अडकवा, जबाब तपास यंत्रणांसमोर द्या, अनिल देशमुखांवर फडणवीसांचा दबाव; श्याम मानवांचा गंभीर आरोप